898 898 8787

PCOD Symptoms in Marathi - PCOD कारण, लक्षण आणि उपाय - MyHealth

Marathi

PCOD Symptoms in Marathi - PCOD कारण, लक्षण आणि उपाय

author

Medically Reviewed By
Dr. Ragiinii Sharma

Written By Komal Daryani
on Oct 6, 2023

Last Edit Made By Komal Daryani
on Mar 18, 2024

share
PCOD Symptoms in Marathi
share

पी. सी. ओ. डी. म्हणजे पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम. या परिस्थितीमध्ये अंडाशयात अपरिपक्व अंडी किंवा काही अंशी परिपक्व अंडी खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात. कालांतराने या अंड्यांचे सिस्ट तयार होतो. हा सिस्ट अंडाशयाचा बराचसा भाग व्यापून घेतो. या सिस्ट मधून पुरुषी हार्मोन्सचा स्त्राव होतो. परिणामी, मासिक पाळी अनियमित होते आणि असे झाल्याने संपूर्ण जीववनशैली बिघडून शरीरात इतरही विकार उद्भवतात. 

पी. सी. ओ. डी. हा विकार जगभरात अनेक स्त्रियांमध्ये आढळतो. बदलती जीवनशैली, ताण, नैराश्य, लठ्ठपणा या मुळे स्त्रियांमध्ये हा विकार उद्भवतो. 

पी. सी. ओ. डी. वाढल्याने वंध्यत्व येण्याची शक्यता अधिक असते. यावर योग्य आणि वेळेत उपचार झाले नाही तर मधुमेह तसेच हृदयाचे विकार सुद्धा उद्भवतात. 

पी. सी. ओ. डी. विकाराची लक्षणे 

पी. सी. ओ. डी. ची लक्षणे प्रत्येकामध्ये वेगवेगळी असतात, त्या मधील काही लक्षणे पुढील प्रमाणे 

  • अनियमित पाळी : नेहमीच्या तारखेला पाळी न येणे, किंवा नेहमीच्या तारखेपेक्षा खूप उशिराने पाळी येणे हे पी. सी. ओ. डी. चे प्रकर्षाने जाणवणारे लक्षण आहे. अनेकदा पाळी दोन ते सहा महिने येत नाही. अशावेळी तातडीने डॉक्टरांना दाखवणे अतिशय गरजेचे आहे. पी. सी. ओ. डी. च्या महिलांना पाळी आल्यानंतर रक्तप्रवाह अधिक प्रमाणात होतो. 
  • केस गळती : पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांमध्ये डोक्यावरील केसांच्या गळतीचे प्रमाण आढळते. केसांची योग्य निगा राखून सुद्धा केस गळती होते. पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांमध्ये पुरुषी हार्मोन्स चे प्रमाण वाढल्याने डोक्याच्या मागच्या भागातले म्हणजेच भोवरा असलेल्या भागातले केस पुरुषांप्रमाणे गळू लागतात. 
  • त्वचेमधील बदल: असंतुलित हार्मोन्स मुळे पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांना चेहऱ्यावर, मानेवर तसेच पाठीवर पुरळ येण्याचे प्रमाण वाढते. तसेच मानेच्या मागच्या बाजूला, काखेत, खाजगी भागात काळपटपणा जाणवतो. 
  • वजनात चढउतार: पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांमध्ये लठ्ठ असण्याचे प्रमाण अधिक महिलांमध्ये आढळून येते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असून सुद्धा वजन कमी होत नसेल तर हे नक्कीच पी. सी. ओ. डी. चे लक्षण आहे. 
  • अतिरिक्त केसांची वाढ: वर सांगितल्याप्रमाणे पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांच्या डोक्यावरील केसांची गळती होते परंतू, चेहऱ्यावर, पाठीवर, पोटावर, छातीवर केसांची अतिरिक्त वाढ होते.
  • तीव्र डोकेदुखी: वारंवार डोकेदुखी किंवा अर्धशिशी चा त्रास पी. सी. ओ. डी. च्या महिलांमध्ये आढळतो. 
  • प्रजनन प्रक्रियेत अडथळा: पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांना गर्भधारण करण्यात अडथळे येऊ शकतात. 
  • मधुमेह: पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांना मधुमेह असण्याची शक्यता असते. 
  • ताण: पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांना नैराश्य, तणाव मोठ्या प्रमाणात जाणवतं. 

पी. सी. ओ. डी. वर उपाय 

पी. सी. ओ. डी. बरा होण्यासाठी विशिष्ठ औषधे बनलेली नाही. परंतू योग्य आहार घेतल्यास आपण पी. सी. ओ. डी. वर नियंत्रण आणू शकता. 

  • ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. जसं कि, धान्य, शेंगा, विविध प्रकारच्या बिया, फळं, प्रक्रिया न केलेले पदार्थ यांचे सेवन करावे. 
  • ओमेगा फॅटी ऍसिड असलेल्या माश्यांचे सेवन करावे. या मध्ये टुना मासा, सार्डीनस मासा, साल्मोन मासा, बांगडा मासा, या माश्यांचा समावेश करावा. 
  • डार्क चॉकोलेट चे योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करावे. 
  • चांगले चरबीयुक्त पदार्थ, ऑलिव्ह ऑइल, सुका मेवा, बदाम, पिस्ता यांचे सेवन करावे. 
  • सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, जसे कि पालक, शेवग्याचा पाला, ब्रोकोली, शेपू यांचा आहारामध्ये समावेश करावा. 
  • कच्च्या फळभाज्यांचे सेवन जेवणाच्या आधी किंवा रिकाम्या पोटी करावे. कच्च्या फळभाज्यांमध्ये काकडी, गाजर, बीट, कोबी, पांढरा कांदा यांचा समावेश होतो. 
  • दालचिनी, लवंग, हळद या सारख्या गरम मसाल्यांचा समावेश आहारात करावा. 
  • नियमित व्यायाम करावा आणि वजन नियंत्रित ठेवावे. 
  • योग केल्याने ताण तणाव कमी होतो. ताण तणाव कमी होणे पी. सी. ओ. डी. च्या महिलांसाठी अतिशय गरजेचे आहे, त्या मुळे पी. सी. ओ. डी. असलेल्या महिलांना नियमित योगाभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो.
  • शक्य तितके पाणी पिऊन शरीराला पाण्याचा पुरवठा करावा. 

पी. सी. ओ. डी. च्या महिलांनी काय टाळावे 

  • उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये. 
  • तेलकट पदार्थ खाऊ नये. 
  • बर्गर, पिझ्झा या सारखे पदार्थ आणि मैदा असलेले पदार्थ खाऊ नये. 
  • साखर असलेले पदार्थ कमी करावे. साखरेच्या ऐवजी गूळ किंवा मधाचा वापर करावा. 
  • सोडा असलेले द्रव्य / कोल्ड्रिंक्स पिऊ नये. 
  • धूम्रपान आणि अल्कोहोल युक्त पदार्थांचे सेवन करू नये. 
  • कॅफिन चे सेवन कमी करावे. 
  • लाल मासाचे सेवन करू नये.
  • सतत एकाजागी बसून राहणे टाळावे. 

पी. सी. ओ. डी. चे निदान कसे करावे 

  •  चेहऱ्यावरील, पाठीवरील, पोटावरील अतिरिक्त वाढलेल्या केसांवरून पी. सी. ओ. डी. असल्याचे लक्षात येते. असे आढळून आल्यास आपल्या डॉक्टरांना त्वरित दाखवावे. 
  • रक्ततपासणी: आपल्या जवळच्या डॉक्टरांना विचारून पी. सी. ओ. डी. साठी रक्तचाचण्या करून घेऊन त्याचे निदान करावे. 
  • अल्ट्रासाउंड: पी. सी. ओ. डी. ची लक्षणे दिसल्यास डॉक्टर पहिल्यांदा अल्ट्रासाउंड करण्याचा सल्ला देतात. यातून अंडाशयातील सिस्ट चा आकार लक्षात येतो. किंवा अंडाशयात काय त्रास आहे याचा अंदाज येतो आणि पी. सी. ओ. डी. वर उपचार करता येतो. 

निष्कर्ष 

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा बैठ्या जीवनशैलीमुळे वय वर्ष १२ ते ५१ वयोगटातील १०० पैकी १० महिलांना पी. सी. ओ. डी. चा विकार होतो. या विकारामध्ये सुरुवातीला मासिक पाळी चुकल्याचे अनेक महिलांमध्ये दिसून येते. यावर योग्य उपचार न झाल्यास प्रजनन होण्यास सुद्धा अडथळे येऊ शकतात. 

योग्य आहार घेतल्यास आणि पूरक व्यायाम केल्यास तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतल्यास पी. सी. ओ. डी. च्या विकारावर नियंत्रण आणता येते. परंतू, एकदा नियंत्रण आणल्या नंतर पुन्हा वाईट जीवनशैलीचा अवलंब केल्यास पी. सी. ओ. डी. चा विकार पुन्हा उद्भवू शकतो.

Leave a comment

1 Comments

  • Aarya Chaudhari

    Dec 14, 2023 at 2:01 PM.

    I want to know whether i have a pcod or not

    • Myhealth Team

      Dec 15, 2023 at 12:11 PM.

      For a definitive diagnosis of PCOS, consult a healthcare professional who can assess your symptoms and may recommend tests like blood work or ultrasound.

Consult Now

Share MyHealth Blog