898 898 8787

Lipid Profile Test in Marathi: आपल्या आरोग्याची देखरेख करण्यासाठी आवश्यक माहिती

Lab Test

Lipid Profile Test in Marathi: आपल्या आरोग्याची देखरेख करण्यासाठी आवश्यक माहिती

author

Medically Reviewed By
Dr. Ragiinii Sharma

Written By Komal Daryani
on Aug 14, 2023

Last Edit Made By Komal Daryani
on Mar 18, 2024

share
Lipid Profile Test
share

लिपिड म्हणजे काय 

लिपिड हा शरीरातील चरबीयुक्त आणि मेणासारखा असलेला घटक आहे, जो पाण्यात विरघळत नाही. लिपिडची शरीराला विविध प्रकारे मदत होते. लिपिड पेशींमध्ये ऊर्जा साठवण्यास मदत करतो. जीवनसत्व शोषून हार्मोन्स तयार करण्यास मदत करतो. शरीरातील पेशींच्या भिंतीमध्ये लिपिडचे प्रमाण आढळते. पेशींच्या आत आणि बाहेर जाणाऱ्या घटकांवर लिपिड चे नियंत्रण असते. 

सामान्य शब्दात लिपिड म्हणजे चरबी किंवा तेल. रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडचे प्रमाण मोजणाऱ्या चाचणीला लिपिड प्रोफाइल चाचणी असे म्हणतात. 

रक्तात लिपिड चे म्हणजेच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले तर ते रक्तवाहिन्यांमध्ये चिकटून बसते. ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होत जातात. परिणामी, हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत होत नाही आणि हृदयरोग उद्भवतात. 

थोडक्यात लिपिड प्रोफाइल चाचणी शरीरातील हृदयरोगाचा धोका समजून घेण्यासाठी केली जाणारी चाचणी आहे. 

लिपिड प्रोफाइल चाचणी चे घटक 

  • टोटल कोलेस्ट्रॉल - हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL), लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL), व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (VLDL), हे कोलेस्ट्रॉल चे काही प्रकार आहेत. यांची पातळी मोजणे म्हणजे टोटल कोलेस्ट्रॉल मोजणे. 

आपल्या अन्नातून कोलेस्ट्रॉल ची निर्मिती होते. यकृत कोलेस्ट्रॉल तयार करतो. हा कोलेस्ट्रॉल रक्तात किंवा पाण्यात विरघळत नाही त्यामुळे, शरीरात जिथे जिथे कोलेस्ट्रॉलची गरज आहे तिथे रक्तातील प्रथिने कोलेस्ट्रॉल पोहोचवण्याचे काम करते.  या कोलेस्ट्रॉलची वाहकांना लिपोप्रोटीन असे म्हणतात. 

  • हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) - वर सांगितल्या प्रमाणे लिपोप्रोटीन हे कोलेस्ट्रॉल गरज असलेल्या जागी पोहोचवण्याचे काम करते. कधीकधी कोलेस्ट्रॉल चे प्रमाण अधिक असते. हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल (HDL) अधिक असलेले कोलेस्ट्रॉल पुन्हा यकृतापर्यंत पोहोचवते. यकृत या कोलेस्ट्रॉलचे विभाजन करतो आणि याची शरीरामधून सुटका करतो. असे केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल चिकटून हृदयाचे रोग होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. म्हणूनच हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल (HDL) ला चांगले कोलेस्ट्रॉल असे म्हटले जाते. 

शरीरामध्ये हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल (HDL) चे प्रमाण ६० मिलिग्रॅम्स पर डेसिलिटर (mg/dL) किंवा याहून अधिक असेल तर हृदयाशी निगडित रोगांचा धोका फारच कमी प्रमाणात असतो असे तंज्ञानांचे म्हणणे आहे. 

  • लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) - लो डेन्सिटी लिपोप्रोटीन रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये जमा होतो. ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, हृदयाचा रक्तप्रवाह कमी होतो किंवा ब्लॉक होतो. परिणामी, ह्रदयाचे रोग, हार्ट अटॅक उद्भवतो. 

हृदयाचे रोग, मधुमेह किंवा अनुवांशिकतः शरीरात कोलेस्ट्रॉल चे प्रमाण अधिक असल्यास लिपिड प्रोफाइल चाचणी करायचा सल्ला डॉक्टर देतात. 

  • व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (VLDL) - व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (VLDL) हे विविध प्रकारचे फॅट्स वाहून नेतं, ज्यात ट्रायग्लिसराईड्स असतात. बैठ्या जीवनशैलीमुळे आणि धुम्रपानामुळे शरीरातील व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (VLDL) चे प्रमाण वाढले जाऊ शकते.
  • ट्रायग्लिसराईड्स - शरीरामध्ये न वापरलेले कॅलरी फॅट हे पेशींमध्ये साठून बसतात, त्यांना ट्रायग्लिसराईड्स असे म्हणतात. हे फॅट्स कंबरेच्या भागात आणि ओटी पोटात अधिक प्रमाणात साचले जातात. जेव्हा शरीराला पुरेसा अन्नपुरवठा होत नाही किंवा भूक लागलेली असते परंतू लगेचच काही खाता येत नाही, अशा वेळी ट्रायग्लिसराईड्स शरीराला ऊर्जा पुरवते. 

शरीरामध्ये ट्रायग्लिसराईड्स चे प्रमाण वाढणे धोक्याचे असते. तेलकट पदार्थांचे जास्त सेवन केल्याने, जंक फूड अधिक प्रमाणात खाल्ल्याने, धूम्रपान केल्याने, अधिक प्रमाणात मद्याचे सेवन केल्याने, तंबाखू चे सेवन केल्याने शरीरामध्ये ट्रायग्लिसराईड्सचे प्रमाण वाढते. असे झाल्यास हृदयाचे रोग होण्याची संभावना असते. 

कोलेस्ट्रॉल काही वाईट नाही. ते आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स, पाचक द्रव्य, व्हिटॅमिन्स बनवण्याचे कार्य करते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल शरीरासाठी अत्यंत गरजेचा घटक आहे. परंतू त्याचे प्रमाण वाढल्यास शरीरात खूप मोठे होऊ शकतात. त्यामुळे योग्य तो आहार घेऊन आणि योग्य पथ्य पाळून कोलेस्ट्रॉल ची पातळी सांभाळणे अतिशय गरजेचे आहे. 

लिपिड प्रोफाइल चाचणी का केली जाते 

  • मधुमेह, किडनी चे विकार, अंडाशयाचे विकार, थायरॉईड, इत्यादी विकार असल्यास लिपिड प्रोफाइल चाचणी करून घेण्याचे सुचवले जाते. 
  • तज्ञांच्या म्हणण्या नुसार तुमची जीवनशैली योग्य नसेल तर नक्कीच एकदा लिपिड प्रोफाइल चाचणी करून घ्यावी. 
  • लठ्ठ पणा आणि वजन जास्त असल्यास लिपिड प्रोफाइल चाचणी करून घ्यावी. 
  • उच्च रक्तदाब असल्यास लिपिड प्रोफाइल चाचणी करण्याचे सुचवले जाते. 
  • तुम्ही नियमित धूम्रपान करत असाल तर लिपिड प्रोफाइल चाचणी आवर्जून करून घ्यावी. 
  • मद्य सेवनाचे प्रमाण अधिक असेल तरी लिपिड प्रोफाइल चाचणी करून घ्यावी. 
  • वय वर्ष ४५ च्या वरच्या पुरुषांनी आणि वय वर्ष ५० च्या वरच्या महिलांनी आपली लिपिड प्रोफाइल चाचणी करून घ्यावी. 
  • तसेच, असे प्रौढ ज्यांना काहीच विकार नाही अशांनी सुद्धा दर  ४ ते ६ वर्षांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन, उपवास करून लिपिड प्रोफाइल चाचणी करून घ्यावी, जेणेकरून भविष्यात उद्भवणारा हृदयविकार किंवा इतर कोणत्याही मोठ्या विकाराचा धोका टाळता येईल. 
  • ज्यांना हृदयाचे विकार असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने वरचेवर लिपिड प्रोफाइल चाचणी करून आपल्या तब्येतीची तपासणी करावी. 
  • ज्यांचा कौटुंबिक इतिहास हृदयरोगाचा किंवा मधुमेहाचा असेल त्यांनी लिपिड प्रोफाइल चाचणी करून घ्यावी. 

लिपिड प्रोफाइल चाचणीसाठी काय गरजेचे असते 

लिपिड प्रोफाइल चाचणीसाठी रुग्णाच्या रक्ताचा नमुना गरजेचा असतो. 

लिपिड प्रोफाइल चाचणी कशा प्रकारे केली जाते 

  • लिपिड प्रोफाइल चाचणी ही शक्यतो सकाळी केली जाते. रात्रभर पोट रिकामी ठेवण्याची सूचना दिली जाते आणि सकाळी लॅब मध्ये रक्ताचा नमुना घेण्यासाठी बोलावले जाते. 
  • तुम्हाला एका खुर्चीवर बसवले जाते. नर्स किंवा आरोग्य सेवक तुमच्या हातातली सहजरित्या सापडणारी नस शोधतात. हि नस शक्यतो हाताच्या कोपऱ्याच्या आतल्या बाजूस सापडते. 
  • नस सापडली कि तो भाग औषधी द्रव्यांनी स्वच्छ केला जातो. औषधी द्रव्य लावल्यावर त्या भागावर थंडपणा जाणवेल. 
  • त्या नंतर सुईच्या मदतीने रक्ताचा नमुना घेतला जाईल. त्या जागी मुंगी चावल्यासारखे जाणवेल. 
  • पुरेसे रक्त घेतल्यानंतर सुई बाहेर काढली जाईल. त्यानंतर रक्त पुन्हा आपल्या वाहिन्यांमधून सुरळीत प्रवाह करेल त्यामुळे काळजीचे काही कारण नाही. 
  • ते रक्त एका प्लास्टिकच्या छोट्या डब्यात साचवून ठेवले जाईल आणि तपासणीसाठी पुढे पाठवले जाईल. 
  • सुई टोचलेल्या जागेवर कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये म्हणून तिथे छोटी पट्टी लावली जाईल. 

लिपिड प्रोफाइल चाचणीचे काही दुष्परिणाम आहेत का 

नाही. लिपिड प्रोफाइल चाचणी ही अतिशय सुरक्षित पद्धतीने केली जाणारी चाचणी आहे. चाचणी दरम्यान सुई टोचत असताना कदाचित त्या भागावर दुखू शकते किंवा थोडी जखम होऊ शकते. परंतू  हे लगेचच बरे होण्या सारखे आहे त्यामुळे काळजीचे काही कारण नाही. 

लिपिड प्रोफाइल चाचणी करण्याआधी काय तयारी करावी

लिपिड प्रोफाइल चाचणी हि शक्यतो सकाळी केली जाते. चाचणीपूर्वी १० ते १२ तासांचा उपवास करण्याचे डॉक्टर सुचवतात. या दरम्यात पाणी पिऊ शकता. परंतू चहा, कॉफी, दूध किंवा पाण्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे द्रव्य आणि कोणताही पदार्थ खाल्ला जाऊ नये. 

निष्कर्ष 

लिपिड प्रोफाइल चाचणी रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड्स चे प्रमाण तपासते. ज्या व्यक्तींना हृदयाचे विकार, स्वादुपिंडाचे विकार, किडनी चे विकार, रक्तदाब, मधुमेह किंवा लठ्ठपणा असेल, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने लिपिड प्रोफाइल चाचणी करून घ्यावी. 

तसेच निरोगी प्रौढांनी दर ४ ते ६ वर्षांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने लिपिड प्रोफाइल चाचणी करून घ्यायचे सुचवले जाते. 

Leave a comment

Consult Now

Share MyHealth Blog