898 898 8787

हृदयरोग: प्रतिबंध, जोखीम घटक आणि निरोगी जीवनशैली टिपा - MyHealth

Heart

हृदयरोग: प्रतिबंध, जोखीम घटक आणि निरोगी जीवनशैली टिपा

author

Medically Reviewed By
Dr Divya Rohra

Written By Komal Daryani
on Aug 23, 2023

Last Edit Made By Komal Daryani
on Mar 15, 2024

share
Heart Disease
share

हृदयाशी निगडित होणाऱ्या आजारांना हृदयरोग म्हणतात. हृदयरोगाचे प्रमाण आढळण्यात भारत देश अव्वल स्थानावर आहे. हृदयरोगामुळे जागीच मृत्यू येण्याची शक्यता मोठ्याप्रमाणात आहे. साधारणतः वृद्धांमध्ये वृद्धाकपामुळे हृदयरोगाचे प्रमाण आढळून यायचे परंतू आता तरुणांमध्ये सुद्धा हृदयरोगाचे प्रमाण प्रकर्षाने आढळून येत आहे. 

बदलती जीवनशैली, फास्ट फूड चे मोठ्या प्रमाणात सेवन करणे, मद्याचे आणि अमली पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करणे, या सारख्या अनेक वाईट सवयींनमुळे भारतात हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. 

हृदयरोगामध्ये मोठ्या प्रमाणात हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा विकार म्हणजेच कोरोनरी आर्टरी डिसीज (Coronary artery disease - CAD ) हा रोग आढळतो. हृदयाला योग्य प्रमाणात रक्त पुरवठा ना झाल्याने हा विकार उद्भवतो तसेच cardiovascular disease म्हणजेच ह्रदय व रक्तवाहिन्यांसंबंधी विकार उद्भवतो. 

प्रतिबंध 

  • अतिशय तेलकट पदार्थ खाणे टाळणे.
  • एकाच जागी बसून न राहता हालचाल करणे आणि नियमित व्यायाम करणे. 
  • अतिप्रमाणात मद्याचे सेवन न करणे. 
  • धूम्रपान टाळणे. 
  • रक्तदाब वाढू न देणे. 
  • मधुमेह वाढू न देणे. 

जोखीम घटक 

हृदयरोगासाठी कारणीभूत असलेले जोखीम घटक पुढील प्रमाणे:

  • खाण्याच्या वाईट सवयी - अतिशय तेलकट पदार्थ खाणे, जास्त मसालेदार पदार्थ खाणे, विशेतः रस्त्यावरचे अस्वच्छ पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण लोकांमध्ये वाढले आहे. अशा पदार्थांच्या सेवनामुळे रक्तात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. त्याच्याप्रमाणे या पदार्थांमुळे गॅसचे प्रमाण सुद्धा वाढते, परिणामी हृदयाला रक्त पुरवणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडचण निर्माण होते आणि हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो, ज्यामुळे हार्ट अटॅक येण्याची संभावना असते. 
  • शरीराची हालचाल न करणे - बदलत्या टेक्नोलॉजी मुळे कुठलेही काम एका जागी बसून कारणे सोपे झाले आहे, पण त्या मुळे माणसाची हालचाल कमी झाली आहे. कोरोना काळापासून वर्क फ्रोम होम म्हणजेच घरी बसून काम करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे माणूस एकाच जागी अनेक तास बसतो आणि त्यामुळे रक्त वहिन्या ब्लॉक होतात. ज्यांच्या शरीराची हालचाल होत नाही त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाचे विकार जसे की हार्ट अटैक किवा हृदय बंद पाडणे इत्यादी भविष्यात उद्भवण्याची शक्यता अधिक असते असे निदर्शनास आले आहे. 
  • लठ्ठपणा आणि कॉलेस्ट्रोलचे वाढते प्रमाण - लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रोल आजकाल बऱ्याच लोकांमधे आढळून येतो. खाण्या पिण्याच्या वाईट सवयींमुळे कॉलेस्ट्रोलचे प्रमाण वाढते. विशेषतः तरुणांमध्ये तसेच लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रोचे प्रमाण दिसून येते. कोलेस्ट्रोल हा घटक यकृत तयार करतो. हा घटक मेणासारखा चिवट असतो. यकृत आपल्या शरीराला पुरेसा कॉलेस्ट्रोल निर्माण करत असतो, परंतू गरजेपेक्षा जास्त कॉलेस्ट्रोल निर्माण झाला की तो रक्त वाहिन्यांच्या भिंतींना चिकटतो. त्या मुळे हृदयाला रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद होत जातात आणि हृदयाला रक्त पुरवठा कमी होतो. 
  • अतिप्रमाणात मद्याचे सेवन - नियमित आणि अतिप्रमाणात मद्याचे सेवन केल्याने किडनी आणि  यकृताचे विकार होतात ज्यामुळे हृदयाचे कार्य मंदावते, हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि हृदयाचे रोग होतात. 
  • धूम्रपान - धुम्रपानामुळे रक्त जाड आणि चिकट होते ज्यामुळे रक्ताच्या गूठळ्या निर्माण होतात. या मुळे हृदयाच्या डाव्या बाजूस दुखण्याचे प्रमाण वाढते. 
  • मधुमेह - रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मधुमेह होतो. अनियंत्रित मधुमेह हे हृदयाच्या रोगांचे एक महत्त्वाचे कारण आहे. 
  • उच्च रक्तदाब - शरीरातील रक्ताचा दाब रक्त वाहिन्यांवर अधिक प्रमाणात येतो या परिस्थितीला उच्च रक्तदाब म्हणतात. उच्च रक्तदाबावर लवकर उपचार न केल्यास हृदयाचे स्नायू जाड होतात, त्याचा दाब हृदयावर येतो आणि त्यामुळे रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो. असे झाल्यास शरीरातील इतर अवयवांना ऑक्सीजन चा पुरवठा कमी प्रमाणत होतो. उच्च रक्तदाबामुळे हृदय कायमचे बंद पडू शकते. तसेच इतरही हृदयरोग होऊ शकतात. 
  • ताण व चिंता - सतत चिंता आणि ताण तणाव असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयरोगाचे प्रमाण आढळून आले आहे. पॅनिक अटॅक्स येणे, नैराश्य येणे यामुळे रक्तदाबाचे विकार उद्भवतात, परिणामी हृदयाचे स्वास्थ्य बिघडते. 
  • वय - वाढत्या वयानुसार हृदयाचे विकार उद्भवतात. वयाच्या ६५ नंतर रक्तवाहिन्यामध्ये चरबी साचून हृदयविकाराचा धोका वाढतो. 
  • अनुवांशिकता - ज्यांच्या कुटुंबामध्ये पूर्वजांना उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा असे विकार होते त्यांना  हृदविकार होण्याची शक्यता असते. 

निरोगी जीवनशैली टिपा

निरोगी जीवनशैलीचे पालन केल्याने हृदयविकारासोबतच इतरही रोगांपासून दूर राहता येऊ शकते. निरोगी जीवनशैली टिपा पुढील प्रमाणे - 

  • पौष्टिक आहार - हृदयाला पोषक अशा पदार्थांचे सेवन करणे अत्यंत उपयुक्त ठरेल. आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाजांचा समावेश करणे, तंतुमय पदार्थ खाणे, तेलकट पदार्थ कमी करणे, चांगल्या स्नीग्ध पदार्थांचा योग्य वापर जेवणात करणे, फळे आणि धान्ये आहारामध्ये समाविष्ठ करणे. मीठ म्हणजेच सोडिअम योग्य प्रमाणात वापरणे, साखरेचे प्रमाण कमी करणे.  त्याचप्रमाणे उघड्यावरचे पदार्थ आणि बाहेरचे अन्न पदार्थ ज्याला फास्ट फूड असे म्हटले जाते, खाणे टाळणे. अतिरीक्त प्रमाणात खाऊ नये. 
  • नियमित व्यायाम - नियमित व्यायाम केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी होते आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो त्यामुळे हृदयाला रक्त पुरवठा उत्तम प्रकारे होतो. नियमित व्यायाम केल्याने हृदय सुदृढ राहते. 
  • मधुमेह नियंत्रित ठेवणे - मधुमेह नियंत्रित आहे की नाही हे बघण्यासाठी मधुमेहाचे वारंवार परीक्षण करणे गरजेचे आहे. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी पोषक आहार घेणे गरजेचे आहे. मधुमेह नियंत्रित राहिल्यास हृदयरोगाचा धोका कमी होतो. 
  • रक्तदाब तपासणे - आपल्याला रक्तदाबाचे विकार असल्यास, वेळोवेळी रक्तदाब तपासणे. रक्तदाबाची  औषधे न चुकता घेणे अतिशय उपयुक्त ठरेल. 
  • धूम्रपान बंद करणे - धूम्रपान बंद करणे आपल्यासह इतरांच्या आरोग्यासाठीसुद्धा योग्य ठरेल. धूम्रपान केल्याने स्वतः सोबतच आजूबाजूला असलेल्या इतरांच्या शरीरावरही त्याचा परिणाम होतो. धूम्रपान बंद केल्याने ह्रदयरोगाचा धोका कमी होतो. धूम्रपान बंद करण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
  • मद्याचे प्रमाण कमी करणे - योग्य किंवा कमी प्रमाणात मद्याचे सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. पुरुषाने दिवसातून २ पेक्षा जास्त ड्रिंक घेऊ नये आणि स्त्री ने १ पेक्षा जास्त ड्रिंक घेऊ नये असे डॉक्टर सुचवतात. मद्य सेवन पूर्णपणे बंद करणे उपयुक्त ठरेल. 
  • वजन नियंत्रित ठेवणे - शरीराची नियमित हालचाल करणे, एका जागी फार वेळ बसून न राहणे या मुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. नियमित हालचालीमुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. 
  • नियमित आरोग्य तपासणी - आपल्या कुटुंबामध्ये पूर्वी कोणाला उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉल असल्यास नियमित पणे संपूर्ण शरीराची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. कोणताही अनुवांशिक आजार नसला, तरी सुध्दा नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे, ज्या मुळे भविष्यतील धोका टळू शकतो.

निरोगी जीवनशैली ठेवल्यास आणि वेळोवेळी आपल्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केल्यास भविष्यात उद्भवणारा हार्ट अटैक किंवा कुठल्याही प्रकारचा ह्रदयरोग  टाळता येऊ शकतो.

Leave a comment

Consult Now

Share MyHealth Blog