कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढते? कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधाचे उपाय

Medically Reviewed By
Dr. Mayanka Lodha Seth
Written By Sheena Mehta
on Nov 5, 2025
Last Edit Made By Sheena Mehta
on Nov 5, 2025

तुमच्या शरीराला लागणारे कोलेस्टेरॉल हे काही वाईट नाही, तर एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या कोलेस्टेरॉलपैकी सुमारे 70 ते 80% भाग आपले लिव्हर तयार करते. हे यकृत आपल्या आहारातील फॅट, साखर आणि प्रोटीन यांचा वापर करून कोलेस्ट्रॉल तयार करतं. ते आपल्या पेशींच्या भिंती मजबूत ठेवतं, हार्मोन्स तयार करण्यात मदत करतं, आणि खूप काही. पण काही वेळा यकृत जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल तयार करतं. त्यातच आपण दररोज तेलकट आणि कोलेस्ट्रॉलयुक्त अन्न घेतल्यास शरीरात कोलेस्ट्रॉल वाढतं. चला तर मग पाहूया कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणं कोणती आणि ते नियंत्रणात कसं ठेवता येईल.
कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
कोलेस्ट्रॉल हा आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारा फॅटी पदार्थ आहे. तो रक्तात फिरत असतो आणि शरीराच्या जवळपास प्रत्येक पेशीमध्ये आढळतो.
कोलेस्ट्रॉलचे प्रकार
कोलेस्ट्रॉलचे दोन प्रमुख प्रकार आहेत-
- लो डेन्सिटि लिपोप्रोटिन (LDL)- याला "वाईट कोलेस्ट्रॉल" म्हणतात, कारण ते रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जमा होते आणि चरबीचे थर तयार करते. यामुळे रक्ताचा प्रवाह मंदावतो आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो.
- हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) - याला "चांगले कोलेस्ट्रॉल" म्हणतात, कारण ते रक्तवाहिन्या आणि शरीरातील इतर भागांतून जास्त असलेले कोलेस्ट्रॉल गोळा करते. हे गोळा केलेले कोलेस्ट्रॉल पुन्हा यकृताकडे घेऊन जाते, जिथे त्याची विल्हेवाट लावली जाते. अशा प्रकारे ते रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते.
- ट्रायग्लिसराइड्स- हे कोलेस्ट्रॉलचे प्रकार नाहीत, पण रक्तातील महत्वाचे लिपिड आहेत जे शरीरातील ऊर्जा साठवण्यासाठी वापरले जातात
कोलेस्ट्रॉलचे आदर्श प्रमाण
|
प्रकार |
आदर्श पातळी |
|
एकूण कोलेस्ट्रॉल (Total Cholesterol) |
200 mg/dL पेक्षा कमी |
|
LDL (वाईट कोलेस्ट्रॉल / Bad Cholesterol) |
100 mg/dL पेक्षा कमी (हृदयाच्या जोखमीसाठी 70 mg/dL पेक्षा कमी) |
|
HDL (चांगलं कोलेस्ट्रॉल / Good Cholesterol) |
पुरुषांसाठी 40 mg/dL किंवा अधिक, महिलांसाठी 50 mg/dL किंवा अधिक |
शरीरात कोलेस्ट्रॉलचं महत्त्व
कोलेस्ट्रॉल शरीरात खालील महत्त्वाची कार्ये करते:
- सेल मेंब्रेन तयार करण्यास मदत करतं, ज्यामुळे पेशी टिकाऊ आणि लवचिक राहतात.
- शरीरात टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन आणि कॉर्टिसॉल सारखे आवश्यक हार्मोन्स तयार करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते.
- व्हिटॅमिन D तयार करण्यासाठी.
- कोलेस्ट्रॉलपासून पित्त रस (बाइल) तयार होतो, जो चरबीचं पचन आणि शोषण करण्यासाठी आवश्यक असतो.
कोलेस्ट्रॉल जास्त होण्याची कारणे
कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे अनेक कारणं असू शकतात. यातील काही प्रमुख कारणं पुढीलप्रमाणे आहेत-
जीवनशैलीशी संबंधित कारणे
- असंतुलित आहार- जर आपल्या आहारात जास्त ट्रान्सफॅट आणि सॅचुरेटेड फॅट्स असतील, तर LDL (वाईट कोलेस्ट्रॉल) वाढण्याची शक्यता वाढते. याशिवाय, कोलेस्ट्रॉलयुक्त अन्न जसे की फास्ट फूड, फ्रायड स्नॅक्स, पॅकेज्ड बिस्कीट, केक, LDL वाढवतात. म्हणजेच, जेवणाचा प्रकार थेट रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलवर प्रभाव टाकतो.
- शारीरिक निष्क्रियता- जर आपण कमी हालचाल किंवा व्यायाम करत नसाल, तर HDL (चांगले कोलेस्ट्रॉल) नीट काम करू शकत नाही. यामुळे LDL रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन एथेरोस्क्लेरोसिस होण्याची शक्यता वाढते. म्हणजेच, फक्त जास्त कोलेस्ट्रॉल खाल्ल्यामुळे नाही तर निष्क्रिय जीवनशैलीमुळेही कोलेस्ट्रॉल जास्त होऊ शकतो.
- लठ्ठपणा- जास्त वजन किंवा लठ्ठपणा असल्यास शरीरात LDL (वाईट कोलेस्ट्रॉल) वाढतो आणि HDL कमी होतो. अशा लोकांमध्ये हृदयविकार, डायबिटीज आणि अन्य metabolic समस्या होण्याची शक्यता वाढते.
- धूम्रपान आणि मद्यपान- धूम्रपान केल्यामुळे HDL, म्हणजे चांगला कोलेस्ट्रॉल, कमी होतो, तर LDL, म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल, वाढतो. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ निर्माण होते आणि धमनींच्या भिंतींना हळूहळू नुकसान होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे, जास्त प्रमाणात मद्यपान केल्यास LDL आणि ट्रायग्लिसराइड्स वाढतात, तर HDL कमी होतो. परिणामी हृदयावर अधिक ताण येतो आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य बिघडते.
आनुवंशिक कारणे
- फॅमिलीअल हायपरकोलेस्टेरोलेमिया (FH)- हा आनुवंशिक आजार आहे. यामध्ये जन्मजात LDL (वाईट कोलेस्ट्रॉल) जास्त प्रमाणात शरीरात असतो. त्यामुळे हृदयाचे आजार तरुण वयात होण्याची शक्यता जास्त असते, जे इतर लोकांपेक्षा अगदी वेगळे आहे.
इतर आरोग्यस्थिती
- हायपोथायरॉईडीझम- या स्थितीत तुमचे शरीर पुरेशा प्रमाणात थायरॉइड हॉर्मोन तयार करू शकत नाही. हे हॉर्मोन यकृताला रक्त प्रक्रिया करण्यात मदत करते. थायरॉइड हॉर्मोनची पातळी कमी झाल्यावर, यकृत रक्तातील चरबीवर योग्य प्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढते.
- मधुमेह- मधुमेह LDL (वाईट कोलेस्ट्रॉल) वाढवतो आणि HDL (चांगले कोलेस्ट्रॉल) कमी करतो. या स्थितीला डायबेटिक डिसलिपिडेमिया म्हणतात.
- क्रॉनिक किडनी रोग- जेव्हा किडनी (मूत्रपिंड) नीट काम करत नाही, तेव्हा शरीरातील लिपिड पचवण्याची प्रक्रिया बिघडते. यामुळे ट्रायग्लिसराइड्स वाढतात आणि HDL (चांगले कोलेस्ट्रॉल) कमी होते.
- इतर स्थिती- ल्युपस, स्लीप ॲपनिया (झोपेत श्वास थांबणे), PCOS, मल्टिपल मायलोमा, एचआयव्ही/एड्स आणि यकृत व स्वादुपिंडाचे रोग यांसारख्या इतर समस्यांचाही कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सच्या पातळीवर परिणाम होतो.
औषधांचा प्रभाव
- अनेक औषधे आणि औषधांचे गट लिपिड प्रोफाइलवर परिणाम करतात. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, अँटीसायकोटिक्स, अँटीकॉन्व्हल्संट्स, हार्मोन्स आणि काही रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतात.
ताण आणि खराब झोप
- ताण- सततच्या ताणामुळे शरीरात कॉर्टिसोल नावाचे संप्रेरक वाढते. हा दीर्घकाळ टिकणारा ताण आणि वाढलेले कॉर्टिसोल हृदयविकाराच्या इतर धोक्यांसोबत रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात.
- खराब झोप- पर्याप्त झोप न झाल्यास चयापचय झपाट्याने बिघडू शकतो आणि लिपिड प्रोफाइल खराब होऊ शकतो.
उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे
सामान्यतः उच्च कोलेस्ट्रॉलचे थेट लक्षणे दिसत नाहीत. अनेकदा व्यक्तीला कोलेस्ट्रॉल वाढल्याचं कळतही नाही, जोपर्यंत शरीरात त्याचे परिणाम गंभीर स्वरूपात दिसू लागत नाहीत. जेव्हा धमनींमध्ये चरबीचा थर (plaque) साचतो, तेव्हा रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. यामुळे रक्ताचा प्रवाह कमी होतो किंवा काही ठिकाणी थांबतो. अशा परिस्थितीत खालील त्रास दिसू शकतात-
- छातीत वेदना (angina).
- श्वास घेण्यास त्रास, दम लागणे.
- मळमळ, भोवळ, डोके हलके होणे.
- त्वचेखाली पिवळसर फॅटी ठिपके (xanthomas) — हे प्रामुख्याने डोळ्यांभोवती, कोपरांवर, गुडघ्यांवर किंवा टाचांवर दिसतात.
- मेंदूपर्यंत रक्तप्रवाह कमी झाल्यास बोलण्यात किंवा दृष्टीत अडथळा, हातपाय सुन्न होणे, गोंधळ किंवा स्ट्रोकची शक्यता वाढते.
निदान
जर तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा आजारांचा त्रास असेल किंवा तुमच्या कुटुंबात कोलेस्ट्रॉलचा इतिहास असेल, तर डॉक्टर कोलेस्ट्रॉल तपासणी म्हणजे लिपीड प्रोफाइल टेस्ट करण्याचा सल्ला देतात.
तसंच, सेडेंटरी लाइफस्टाईल असल्यास, म्हणजे दिवसभर फारशी हालचाल न होणं, व्यायामाचा अभाव, जंक फूडचं सेवन अशा परिस्थितीतही कोलेस्ट्रॉल किंवा फूल बॉडी चेक अप करणे योग्य ठरेल.
उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रण
उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी हे बदल करा-
- संतुलित आहार
- नियमित शारीरिक व्यायाम
- ताण-नियंत्रण, योग, ध्यान
- नीट झोप घ्या
- धूम्रपान-मद्यपान पूर्णपणे टाळा.
- नियमित तपासणी करा
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका.
निष्कर्ष
कोलेस्ट्रॉल हे आपल्या रक्तातील एक महत्त्वाचं घटक आहे जे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतं. मात्र, त्याचं प्रमाण असंतुलित झालं, तर ते शरीरासाठी हानीकारक ठरू शकतं. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे आपल्या जीवनशैलीशी थेट संबंधित असतं. थोडेसे लाइफस्टाइलमधील बदल मोठ्या आजारांपासून जसे हृदयरोग, स्ट्रोक, उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार इत्यादींपासून आपले संरक्षण करू शकतात. दर २ वर्षांनी एकदा कोलेस्ट्रॉल तपासणी करून घेणं ही एक चांगली सवय आहे, ज्यामुळे तुम्हाला शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वेळोवेळी समजत राहते.


