संपूर्ण शरीर तपासणी म्हणजे नेमके काय?
आपल्या आयुष्यात कोरोना आल्यापासून आपण स्वतःच्या व आपल्या प्रियजनांच्या आरोग्याची नकळतपणे जातीने काळजी घेऊ लागलो आहोत. प्रत्येकाला आपण स्वतः आणि आपलं कुटुंब निरोगी राहावं असं वाटत असतं. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी संतुलित आहार आणि जीवनशैली जितकी महत्त्वाची आहे तितकीच शरीराची नियमित तपासणीदेखील महत्त्वाची आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
ज्याप्रमाणे आपण शरीर निरोगी राहावे यासाठी खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतो. त्याचप्रमाणे शरीराची नियमित तपासणी होईल याकडेही लक्ष द्यायला हवे. असे म्हटले जाते की, उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला. हीच बाब गांभीर्याने घेऊन प्रत्येकाने आपली नियमितपणे आरोग्य तपासणी करायला हवी. या लेखातून आपण संपूर्ण शरिरासाठी नेमक्या किती आणि कोणत्या चाचण्या कराव्या लागतात याबाबत माहिती मिळवूया.
Smart Full Body Checkup
Offer Price:
- Total no.of Tests - 86
- Quick Turn Around Time
- Reporting as per NABL ISO guidelines
संपूर्ण शरीर तपासणी का करावी?
आपल्या शरीरातील कोणतीही व्याधी जाणून घेण्यासाठी डॉक्टरांकडून योग्य त्या चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे आजाराचे अचूक निदान होण्यात अडथळे निर्माण होतात.
संपूर्ण शरीर तपासणीचे सर्वात मोठे महत्त्व म्हणजे शरीरातील कोणतीही व्याधी वेळेत ओळखली जाऊ शकते आणि त्यावर योग्य वेळी उपचार करून तिला प्रतिबंध करता येतो.
चाचणीला जाण्यापूर्वी काय करावे आणि काय करू नये?
आरोग्याविषयी समस्यांचे अचूक निदान करण्यासाठी डॉक्टरांकडून रुग्णांना रक्ताचा, मूत्राचा, शरीरातील इतर द्रवपदार्थांचा किंवा शरीराच्या ऊतींचा नमुना घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर रुग्णांना काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागते. अशा परिस्थितीत न घाबरता चाचणीला जाण्यापूर्वी काय करावे आणि काय करू नये याबाबत काही महत्त्वाच्या सूचना पाळाव्यात. या सूचना खालीलप्रमाणे:
- डॉक्टरांकडून शंकांचे निरसन करावे :
डॉक्टरांनी सांगितलेल्या चाचण्यांबाबत मनात काही शंका असल्यास रुग्णांनी त्याबाबत डॉक्टरांना विचारायला हवे. डॉक्टरांच्या सल्ल्याचा चाचणीत योग्य उपयोग होईल.
- चाचणीपूर्वी काही खाणे टाळावे:
वैद्यकीय रक्त तपासणीपूर्वी रुग्णांनी ठराविक तासांसाठी काहीही खाणे टाळावे. तसेच चाचणीपूर्वी काही दिवस मद्यपान, धूम्रपान करू नये.
- चाचणीची वेळ पाळावी:
दिवसाच्या वेळेनुसार एन्झाइम आणि संप्रेरक पातळी बदलू शकते, त्यामुळे डॉक्टरांनी दिलेली चाचणीची वेळ पाळावी. अन्यथा सकाळी १० वाजता चाचणीसाठी जाण्याचा प्रयत्न करावा.
- चाचणीवेळी ताणमुक्त राहावे:
चाचणीपूर्वी शांत बसणे आणि थोडा वेळ आराम करणे आवश्यक असते. शिवाय, चाचणीनंतरही पुरेसे पाणी प्यावे आणि अस्वस्थता निर्माण करणाऱ्या शारीरिक क्रिया टाळाव्या.
- औषधांबाबत डॉक्टरांना सांगणे:
तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तर त्याबाबत चाचणीपूर्वी डॉक्टरांना न चुकता कळवावे. तसेच चाचणीनंतर आवश्यक जीवनसत्त्वे आणि पूरक आहाराबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉक्टर पूर्ण शरीर तपासणीचा सल्ला कधी देतात?
संपूर्ण शरीर तपासणीत डॉक्टर साधारणतः सर्वात आधी व्यक्तीचे वजन आणि उंची मोजतात. त्यानंतर शरीरातील रक्तदाब आणि ऑक्सिजनच्या पातळीसह हृदयाचे ठोके मोजले जातात. त्यानंतरच डॉक्टरांकडून संबंधित व्यक्तीला वेगवेगळ्या चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो.
संपूर्ण शरीर तपासणीत प्रामुख्याने सात ते आठ चाचण्या केल्या जातात, ज्याद्वारे पूर्ण शरीराचे अवलोकन करता येते. यात लघवी, कान, नाक आणि डोळ्यांची तपासणी केली जाते. तसेच रक्तातील साखर, लिपिड प्रोफाइल, किडनी फंक्शन चाचणी, लिव्हर फंक्शन चाचणी, कर्करोग चाचणी, रक्त चाचणी, इत्यादी चाचण्या केल्या जातात.
तपासणीत नेमके काय होते?
सर्वात प्रथम रक्ताची तपासणी केली जाते. ही सर्वात महत्त्वाची चाचणी मानली जाते. यातून शरीरातील हिमोग्लोबिन, पॉलिमॉर्फ्स, लिम्फोसाइट, मोनोसाइट, प्लेटलेट्स, इत्यादींची पातळी मोजली जाते. शुगर, कोलेस्टेरॉल, इत्यादी केवळ रक्त तपासणीद्वारे तपासले जातात. रक्त चाचणीनंतर लघवीची चाचणी केली जाते. या चाचणीतून शरीरातील ग्लुकोज आणि प्रथिनांचे प्रमाण कळते.
हृदयाच्या चाचणीसाठी ईसीजी केली जाते. तर, डोळ्यांचे आरोग्य कसे आहे हे जाणून घेण्यासाठी डोळ्यांची तपासणी केली जाते. यातून अंधत्व, मायोपिया, इत्यादी स्थितींची कल्पना येते. तसेच कानाच्या तपासणीद्वारे ऐकण्याची क्षमता जाणून घेतली जाते. काही परिस्थितींमध्ये डॉक्टर रुग्णांना एक्स-रे आणि स्कॅन करण्याचा सल्ला देतात.
तसेच प्रथिने, अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, बिलीरुबिन, एसजीओटी, इत्यादी चाचण्या यकृताचे आरोग्य कसे आहे हे तपासण्यासाठी केल्या जातात. या चाचणीला ‘एलएफटी’ असेही म्हणतात. संपूर्ण शरीर तपासणीत कर्करोगाशी संबंधित चाचण्यादेखील केल्या जातात. एका ठराविक वयानंतर महिला आणि पुरुष दोघांमध्येही कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे या चाचण्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. तर, किडनीसंबंधित चाचण्यांसाठी किडनी फंक्शन चाचणी केली जाते.
आरोग्य तपासणी नेमकी कोणत्या वयात करावी?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने वर्षभरात एकदा तरी आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने सुदृढ आरोग्यासाठी वयाच्या १८ वर्षांनंतर प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करणे आवश्यक असते. ज्यामध्ये रक्तदाब, बायोमास इंडेक्स यांसारख्या सामान्य चाचण्या केल्या जातात. तसेच २५ ते ४५ वयोगटातील व्यक्तींना लिपिड प्रोफाइल, शुगर टेस्ट, ईसीजी, इत्यादी आवश्यक चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो.
संपूर्ण शरीर तपासणीत किती आणि कोण-कोणत्या चाचण्या कराव्यात हे पूर्णपणे रुग्णांच्या शरीरावर अवलंबून असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच आपल्याला कोणत्या चाचण्यांची गरज आहे हे निश्चित होते.
“भारतात नियमित संपूर्ण शरीराची तपासणी करून घेणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. जे धोकादायक आहे. आजच्या धावपळीच्या, व्यस्त जीवनात ही तपासणी करून घेणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे. आपले वय ५० किंवा ६० वर्षांहून अधिक असेल, तर आपण वर्षातून दोनवेळा पूर्ण शरीराची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.”