अंगावर पित्त उठणे उपाय: घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार

Medically Reviewed By
Dr. Mayanka Lodha Seth
Written By Komal Daryani
on Nov 3, 2025
Last Edit Made By Komal Daryani
on Nov 3, 2025

कधी अंगावर लाल ठिपके, पुरळ किंवा खाज येते का? साधारणपणे लोक म्हणतात, “शरीरात उष्णता वाढलीये, म्हणून पित्त उठलं.” वैद्यकीय भाषेत याला अर्टिकेरिया किंवा हाइव्ज म्हणतात आणि आयुर्वेदात याला शीतपित्त म्हणतात. आयुर्वेदानुसार आपल्या शरीराचं आरोग्य वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांच्या संतुलनावर अवलंबून असतं. जेव्हा हे संतुलन बिघडतं, तेव्हा शरीरात वेगवेगळे विकार दिसू लागतात. शीतपित्त ही अशीच एक त्वचारोगाची अवस्था आहे जी पित्तदोष वाढल्याने होते ज्यामुळे त्वचेवर खाज, लालसरपणा आणि जळजळ जाणवते. चला तर मग, या त्रासदायक पण सामान्य त्वचारोगाबद्दल सविस्तर जाणून घेऊया, त्याची कारणं, लक्षणं आणि आयुर्वेदिक उपाय.
अंगावर पित्त उठण्याची कारणं
अंगावर पित्त उठणे किंवा शीतपित्त ही समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकते. काही कारणं स्पष्ट असतात, तर काही वेळा कोणतंही ठोस कारण सापडत नाही. खालील काही सर्वसाधारण कारणं आहेत-
- खाण्यापिण्याची ॲलर्जी- काही लोकांना विशिष्ट खाद्यपदार्थांमुळे किंवा खाद्य उत्पादनांमुळे ॲलर्जी होते. यात विशेषतः जास्त मसालेदार, तिखट किंवा प्रक्रिया केलेले पदार्थांचा समावेश असतो. बऱ्याचदा, एखादा पदार्थ वर्षानुवर्षे खाल्ला तरी काही वर्षांनी शरीराची प्रतिकारशक्ती त्या पदार्थाविरुद्ध ॲलर्जी विकसित करू शकते. त्यामुळे त्वचेवर खाज, पुरळ आणि अंगावर पित्त उठणे अशा समस्या निर्माण होतात.
- मानसिक ताण- अनेक आरोग्य समस्यांच्या मागे मानसिक ताण (Stress) हे एक मोठे कारण असते. जेव्हा तुम्ही तणावाखाली असता किंवा पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा शरीरातील रोगप्रतिकारक पेशी जास्त प्रमाणात 'हिस्टामाईन' नावाचे रसायन बाहेर टाकतात. हिस्टामाईन हे ॲलर्जी निर्माण करणारे मुख्य रसायन आहे. त्यामुळे शरीरात हिस्टामाईनचे प्रमाण वाढल्यास त्वचेवर पुरळ आणि खाज वाढू शकते.
- हवामानातील बदल- काही व्यक्तींना हवामानात अचानक बदल झाल्यास लगेच पित्ताचा त्रास होतो. अचानक वाढलेली उष्णता, जास्त थंडी किंवा खूप घाम येणे, यामुळे शरीराचे तापमान बिघडते. ऋतु बदलताना, विशेषतः थंडीतून गरम आणि गरमीतून थंड हवामान होताना, पित्त उठण्याची समस्या वाढू शकते.
- इन्फेक्शन- काही व्हायरल किंवा बॅक्टेरियल संसर्गांमुळे त्वचेवर हिव्स येतात.
- औषधं आणि केमिकल्स- काही औषधे, त्वचा उत्पादने किंवा परफ्यूम/सुगंधी उत्पादनांमध्ये असलेल्या विशिष्ट रसायनांमुळे त्वचेवर ॲलर्जीची प्रतिक्रिया होऊ शकते. ही रसायने थेट त्वचेच्या संपर्कात आल्यास किंवा औषध पोटात घेतल्यास ॲलर्जी होऊ शकते.
- सिंथेटिक आणि घट्ट कपडे- सिंथेटिक किंवा खूप घट्ट कपडे वापरल्याने त्वचेला योग्य हवा मिळत नाही आणि त्वचेवर घर्षण निर्माण करतात. यामुळे त्वचेची संवेदनशीलता वाढते आणि पित्त उठण्याची समस्या किंवा त्वचेवर पुरळ येण्याची शक्यता वाढते.
- अज्ञात कारणे- काही वेळा, वैद्यकीय तपासणी करूनही शीतपित्ताचे नेमके कारण सापडत नाही. अशा त्रासाला 'क्रॉनिक इडिओपॅथिक अर्टिकेरिया' असेही म्हणतात. यात शरीराची प्रतिकारशक्ती स्वतःहून ॲलर्जी निर्माण करते, पण त्याचे मूळ कारण अस्पष्ट राहते.
- शीतपित्ताची (अंगावर पित्त उठण्याची) प्रमुख लक्षणे
खालील काही लक्षणं शीतपित्तात सामान्यपणे दिसू शकतात-
- त्वचेवर लाल रंगाचे चट्टे किंवा उठलेले बंप्स (गांधी) येतात. हे पुरळ शरीरावर कुठेही येऊ शकतात.
- डोळे, ओठ, बोटं या भागांवर सुज येणे.
- त्वचेवर अत्यंत तीव्र खाज सुटते आणि त्वचा खूप संवेदनशील होते.
- सतत खाजवल्यामुळे त्वचेवर जळजळ जाणवते. काही वेळा या गांधींमध्ये पातळ द्रव असतो. खाजवल्यामुळे तो द्रव त्वचेवर पसरतो आणि आजूबाजूला अधिक पुरळ निर्माण करतो.
- काही व्यक्तींना पित्ताच्या त्रासासोबत ताप, उलटी किंवा शरीर दुखणे अशी लक्षणेही दिसू शकतात.
- शरीरात पित्त वाढल्यामुळे उष्णता जाणवणे. पण थंड हवा किंवा थंड पाणी लावल्याने आराम वाटण्याऐवजी त्रास वाढू शकतो.
- जास्त तहान लागणे आणि तोंड कोरडं पडणं.
- गंभीर अवस्थेत शरीरातील आतील अवयवांमध्ये सूज येऊ शकते.
जर तुम्हाला अशी लक्षणं दिसत असतील, तर डॉक्टर पुढील काही तपासण्या सुचवू शकतात-
अंगावर पित्त उठल्यावर घरगुती उपाय
पित्तामुळे होणारी खाज, जळजळ आणि पुरळ कमी करण्यासाठी तसेच शरीरातील दोष संतुलित करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक प्रभावी उपचार सांगितले आहेत. हे उपाय तुमच्या लक्षणांमध्ये नक्कीच आराम देतील:
- रक्त शुद्धी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी काढ्यांचे सेवन- रक्तात पित्ताचे प्रमाण वाढल्याने रक्त अशुद्ध होते आणि त्यामुळे त्वचेचे विकार होतात. यासाठी रक्त शुद्धीकरण करणे आवश्यक आहे. गिलोय (गुडुची) ही रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आणि शरीर शुद्ध करणारी उत्तम औषधी वनस्पती आहे. गिलोय, नीम आणि हळद यांचा काढा तयार करून तो दररोज सकाळी उपाशीपोटी प्या. हा काढा शरीरातील उष्णता कमी करून रक्त शुद्ध करतो.
- नीम आणि तुळशीची पाण्याने आंघोळ- काही कडुनिंबाची पाने आणि तुळशीची पाने एकत्र उकळून त्या पाण्याने आंघोळ करा. हे पाणी त्वचेवरील संसर्ग कमी करतं आणि त्वचेचं संरक्षण करतं. लक्षात ठेवा खूप थंड किंवा गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा.
- अॅलोवेरा जेलचा वापर- पुरळ आलेल्या भागावर कोरफड जेल लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि सूज व जळजळ कमी होते. बाजारात मिळणारा सेंद्रिय अॅलोवेरा जेल वापरणं उत्तम. कोरफडीच्या पानांचा थेट वापर केल्यास त्यातील घटक किंवा अस्वच्छतेमुळे खाज आणि बॅक्टेरियाचा धोका वाढू शकतो.
- तेल मालिश- प्रभावित भागावर खोबरेल तेल किंवा गाईचं तूप यांनी हलक्या हाताने मालिश केल्यास त्वचेला आराम मिळतो आणि कोरडेपणा कमी होतो.
- पंचकर्म उपचार- जर शीतपित्त वारंवार होत असेल किंवा जुना त्रास असेल, तर पंचकर्मातील विरेचन (पित्तनाशक रेचक उपचार) आणि रक्तमोक्षण (रक्तशुद्धी उपचार) हे उपचार अत्यंत फायदेशीर ठरतात.
- त्रिफळा- थोडं त्रिफळा चूर्ण घ्या आणि ते एरंडेल तेलात थोडं भाजा. त्यानंतर त्याच्या लहान गोळ्या तयार करा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक गोळी घ्या. त्रिफळा हे तीन फळांपासून बनलेले असतं आवळं, बेहडा आणि हरड. हे तीनही दोष (वात, पित्त, कफ) संतुलित ठेवतात आणि पचनक्रिया सुधारतात.
- अँटी-बॅक्टेरियल मलम- जळजळ शांत करणारे क्रीमत्वचेची उष्णता कमी करण्यासाठी आणि संसर्ग पसरू नये म्हणून ॲण्टी-बॅक्टेरियल मलम किंवा क्रीम लावावे.
- थंडावा देणारे लेप- घरी बनवलेले चंदन, पुदिना आणि तुळस यांचे मिश्रण लावल्यास त्वचेची सूज आणि उष्णता कमी होते.
- पित्तशामक औषध- २ चमचे गाईचे तूप, २ चमचे खडीसाखर (खांड) आणि ४-५ काळी मिरीची पूड एकत्र मिसळून खाणे हे शीतपित्तावर उत्तम औषध मानले जाते.
- नारळपाणी, ताक, कोकम सरबत- शरीरात उष्णता कमी करतात.
- योग आणि प्राणायाम- मानसिक ताण कमी करतात.
- अँटी-हिस्टामिनऔषधे- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अर्टिकेरिया किंवा त्वचेवरील एलर्जीसाठी अँटी-हिस्टामिन औषधं घ्यावीत. ही औषधं शरीरातील हिस्टामिन नावाच्या रसायनाचं प्रमाण कमी करून खाज, सूज आणि लालसरपणा कमी करण्यात मदत करतात.
हलका आहार – पित्त वाढवणारे पदार्थ जसे की खूप तिखट, खारट किंवा गोड पदार्थ टाळा. त्याऐवजी हलका, पचायला सोपा आहार घ्या. तांदूळ, मूगडाळ खिचडी, दही, ताजे फळ, आणि भरपूर पाणी हे शरीर थंड ठेवतात आणि पित्त संतुलित करतात. - व्हिटॅमिन D- सकाळच्या कोवळ्या उन्हात किमान 15 मिनिटं बसणं त्वचेशी संबंधित समस्यांसाठी फायदेशीर ठरतं.
शीतपित्त ही जीवघेणी आजार नाही, पण ती शरीराला त्रास, खाज, आणि मानसिक ताण देऊ शकते. योग्य वेळी काळजी घेतली नाही तर त्वचेवर डाग किंवा खपलीसारखे निशाण राहू शकतात. जर ही समस्या दीर्घकाळ टिकली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य आहार, नियमित दिनचर्या, आणि हवामान बदलाच्या काळात विशेष काळजी घेतल्यास ही समस्या टाळता येते. मूळ कारण शोधा आणि योग्य उपाय करा.


