निरोगी राहण्याचे 10 सोपे उपाय: घरगुती आणि नैसर्गिक उपाय

Medically Reviewed By
Dr. Mayanka Lodha Seth
Written By Sheena Mehta
on Nov 3, 2025
Last Edit Made By Sheena Mehta
on Nov 3, 2025

आपल्याला कोणी 'निरोगी रहा' असे सांगितले किंवा आपण स्वतःहून निरोगी राहण्याचा निर्णय घेतला की, आपल्या मनात लगेच दोन गोष्टी येतात: व्यायाम आणि फळे किंवा ड्राय फ्रूट्स. पण, केवळ ताजी फळे खाऊन आणि जिममध्ये जाऊन आपण पूर्णपणे निरोगी होतो का? हे फक्त आपले शारीरिक आरोग्य आहे. निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिक या तिन्ही स्तरांवर निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचे मानसिक आरोग्य चांगले नसेल, तर तणाव वाढणारच. या तणावामुळे पुढे रक्तदाब, मधुमेह यांसारख्या गंभीर आणि मोठ्या आजारांचा धोका वाढतो, जे अनेक रोगांचे मूळ कारण आहेत. तर चला, पाहूया 10 उत्तम टिप्स!
निरोगी राहण्याचे 10 आवश्यक मार्ग
छोट्या-छोट्या सवयींमधून मोठे बदल घडतात. या १० सोप्या आणि मूलभूत टिप्सच्या मदतीने तुम्ही उत्तम आरोग्य मिळवू शकता. या सवयी सुरू करायला अगदी सोप्या आहेत आणि जर तुम्ही त्यांचं सातत्याने पालन केलंत, तर त्या तुम्हाला आयुष्यभर निरोगी आणि ऊर्जावान ठेवतील.
नैसर्गिक आणि ताजं अन्न खा
तुमचं अन्न हेच तुमचं इंधन आहे. ज्याप्रमाणे एखाद्या वाहनाला योग्य प्रमाणात आणि उत्तम दर्जाचे इंधन न मिळाल्यास कालांतराने ते खराब होते, त्याचप्रमाणे आपलं शरीरही आपण खाल्लेल्या अन्नावर प्रतिक्रिया देते. आरोग्यदायी आणि ताजं अन्न खाल्ल्याने शरीराला उत्तम पोषण मिळते. यामुळे तुमचं गट हेल्थ चांगलं राहतं, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. तुमच्या ताटात जास्तीत जास्त रंग समाविष्ट करा. ही रंगीबेरंगी फळे आणि भाज्या अँटिऑक्सिडंट्स ने परिपूर्ण असतात, जे तुमच्या शरीराला अधिक काळ तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. अशा प्रकारे, तुम्ही प्रीमेच्योर एजिंग टाळू शकता आणि आतून निरोगी राहू शकता. तुमच्या रोजच्या आहारात सुका मेवा आणि ताजी फळे जरूर ठेवा. विशेषतः, दिवसातून कमीत कमी एक फळ खाण्याची सवय लावा.
भरपूर पाणी प्या
आपल्या शरीराचा जवळपास 70% भाग पाण्याने बनलेला आहे. याचा अर्थ, शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी पाण्याची आवश्यकता असते. जे लोक कमी पाणी पितात, त्यांना किडनी स्टोन, डोकेदुखी, थकवा, त्वचेसंबंधी समस्या, कब्ज आणि यूटीआय सारख्या समस्या होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे हे साधे पाणी किती महत्त्वाचे आहे, हे समजून घ्या. जर तुम्हाला साखरेची, प्रक्रिया केलेल्या अन्नाची किंवा सोडा पिण्याची तीव्र इच्छा झाली, तर त्याऐवजी एक ग्लास साधं पाणी प्या. तुमच्या लक्षात येईल की ती भूकलगेच कमी झाली आहे. रोज कमीत कमी 2-3 लिटर पाणी पिण्याचे लक्ष्य ठेवा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते आणि एक नैसर्गिक गलो टिकून राहते. प्रत्येक जेवणाआधी एक ग्लास पाणी प्या.
हालचाल जास्त, बसणं कमी
निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचाल अत्यंत महत्त्वाची आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही एका रात्रीत 'जिम-फ्रीक' बनायला हवे. लहान पावलांनी सुरुवात करा: सकाळी आणि संध्याकाळी चालण्याने शरीराला हलकेसे वॉर्म-अप करा. हळू हळू हलक्या व्यायामाकडे आणि कार्डिओकडे वळा. जर तुम्हाला नियमित व्यायाम कंटाळवाणा वाटत असेल, तर तुम्ही डांस, एरोबिक्स किंवा झुम्बा क्लासेसला नक्कीच जॉईन होऊ शकता. दैनंदिन सवयी बदला. शाळा किंवा कामाच्या ठिकाणी जवळ असेल, तर सायकल चालवण्याचा प्रयत्न करा. यामुळे इंधनाची बचत होते आणि कॅलरी बर्न होतात. लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा. एकाच जागी जास्त वेळ बसून काम केल्याने तुमच्या मणक्याचे, ओटीपोटाचे स्नायू आणि डोळ्यांवर ताण येतो. म्हणून, प्रत्येक तासाभराने १० मिनिटांची छोटी वॉक नक्की घ्या.
पुरेशी झोप घ्या
झोप ही आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. झोप फक्त विश्रांतीसाठी नसते, तर त्यावेळी शरीर स्वतःची दुरुस्ती करतं, मेंदूतील थकवा कमी होतो आणि दिवसभर साचलेले विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. झोपेच्या वेळी मेंदूमधील पिट्यूटरी ग्रंथी जी शरीरातील हार्मोन्सचं नियमन करते ती योग्यरीत्या काम करते. जर झोप अपुरी असेल, तर ही ग्रंथी नीट कार्य करत नाही आणि त्यामुळे हार्मोनल असंतुलन, ताण आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशा समस्या निर्माण होतात. दररोज किमान 6 ते 8 तासांची गाढ झोप घेणं आरोग्यासाठी आवश्यक आहे. जर तुम्हाला झोप नीट येत नसेल, तर झोपायच्या आधी थोडं ध्यान, शांत संगीत, किंवा चांगलं पुस्तक वाचन करा. मोबाईल, कॅफिन आणि ताण या तीन गोष्टी झोपेचे सर्वात मोठे शत्रू आहेत, त्यांना झोपायच्या आधी दूर ठेवा.
सूर्यप्रकाश आणि ताजी हवा घ्या
आजकाल लोक इतके आळशी झाले आहेत की ते व्हिटॅमिन D आणि D3 साठी सप्लिमेंट्स घेत आहेत, जी आपल्याला मोफत सूर्यप्रकाशातून मिळू शकते. शरीराला अन्नातून कॅल्शियम शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. याचबरोबर ते मेंदूच्या आरोग्यासाठी, त्याच्या योग्य कार्यासाठी आणि न्यूरो सेल्सच्या वाढीसाठीही महत्त्वाचं आहे. फक्त आपल्या व्यस्त दिवसातून 15 मिनिटं बाजूला काढा आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात बसा. या दरम्यान योग किंवा प्राणायाम करा. यामुळे तुमच्या फुफ्फुसांना ताजी हवा आणि शुद्ध ऑक्सिजन मिळतो, जो शरीराच्या इतर चांगल्या कार्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
ताणावर नियंत्रण ठेवा
आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण टाळणं खूप कठीण झालं आहे, पण हा ताण शरीर आणि मन दोन्हीवर गंभीर परिणाम करतो. सततच्या ताणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, हृदयविकार, पॅनिक डिसऑर्डर, डिप्रेशन, यांसारखे आजार होऊ शकतात. महिलांमध्ये PCOS, PCOD, हार्मोनल असंतुलन आणि अनियमित मासिक पाळी यामागेही तणाव हे एक मोठे कारण आहे. या सर्व समस्या हळू हळू शरीरात वाढतात. दररोज १० मिनिटं ध्यान किंवा दीर्घ श्वासोच्छ्वास करण्याचे व्यायाम करा. जर्नल लिहायला सुरुवात करा, विश्वासू व्यक्तीशी बोला किंवा गरज वाटल्यास साइकेट्रिस्टची मदत घ्या. कधी ताण जाणवला, तर काही खोल श्वास घ्या किंवा थंड पाण्याचा ग्लास प्या.
स्वच्छता
स्वच्छता ही केवळ सवय नाही, ती एक चांगली शिस्त आणि संस्कार आहे. दिवसातून दोनदा दात घासणे, रोज अंघोळ करणे, हात धुणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे—या मूलभूत गोष्टी प्रत्येकाने पाळल्याच पाहिजेत. या सवयी जंतू आणि बॅक्टेरिया नष्ट करतात, ज्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. अस्वच्छतेमुळे कॉलेरा, टायफॉईड, अतिसार, श्वसनाचे आजार, त्वचेचे विकार, डोळ्यांचे संसर्ग अशा अनेक समस्या उद्भवतात. म्हणूनच नेहमी स्वच्छ कपडे घाला, बेडशीट आणि टॉवेल नियमित धुवा, आणि प्रवास करताना हात स्वच्छ ठेवण्यासाठी लहान सॅनिटायझर किंवा हँडवॉशची बाटली जवळ ठेवा.
आरोग्य तपासणी
सगळ्या काळजी घेतल्यानंतरही आरोग्याच्या काही समस्या होऊ शकतात. पण त्या समस्या गंभीर आजारांमध्ये रूपांतर होऊ नयेत म्हणून नियमित आरोग्य तपासणी खूप महत्त्वाची आहे. नियमित तपासणीमुळे तुम्हाला आरोग्य समस्या लवकर ओळखता येतात आणि त्यांच्यावर त्वरित उपचार करता येतो. यामुळे तुमचा पैसा वाचतो आणि तुम्हाला निरोगी राहण्यासाठी प्रेरणा मिळते. दर २ वर्षांनी एकदा फुल बॉडी चेकअप, थायरॉईड तपासणी, कोलेस्ट्रॉल, व्हिटॅमिन D व B12 अशा महत्त्वाच्या तपासण्या करून घ्या.
स्क्रीनटाइम कमी करा
आरोग्य केवळ शारीरिक नाही, तर मानसिक आणि भावनिक देखील आहे. रील्स आणि बनावट लोकांच्या मागे आपला वेळ घालवण्याऐवजी, तो वेळ कुटुंब आणि प्रियजनांसोबत गुंतवा, जे तुम्हाला प्रोत्साहन देतील, प्रेरणा देतील. अर्थपूर्ण संवाद, हसू आणि प्रेम हे तुमच्या भावनिक आरोग्यासाठी औषधासारखे आहेत. मजबूत सामाजिक नातेसंबंध असणाऱ्या लोकांचं आयुष्य अधिक निरोगी आणि दीर्घ असतं, तसेच त्यांची इम्युनिटीही चांगली राहते.
सजग राहा आणि नेहमी सकारात्मक विचार ठेवा
सजग असणे (Being Mindful) म्हणजे तुमचे विचार आणि भावनांबद्दल तुम्हाला जाणीव असणे. आपण काय खातो, काय बोलतो, आणि कोणत्या वातावरणात राहतो याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अनेकदा आपण एका ठिकाणी बसलो असतो पण विचार काहीतरी दुसऱ्याच गोष्टीत हरवलेले असतात आणि तेही बहुतांश वेळा नकारात्मक विचारच असतात. जेव्हा तुम्हाला असं वाटतं तेव्हा दीर्घ श्वास घ्या आणि वर्तमान क्षणात परत या. समस्येवर चिंता करण्याऐवजी, उपाय शोधण्यावर लक्ष द्या.
दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा, आभार मानण्याची सवय लावा, आणि लहान यश साजरे करा. लक्षात ठेवा निरोगी जीवन एका दिवसात घडत नाही. त्यासाठी सतत प्रयत्न, सकारात्मक दृष्टीकोन, आणि संयम आवश्यक असतो. प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली वेगळी असते. त्यामुळे, तुमच्या शरीराला आणि वेळेला जुळतील आणि तुम्ही सहज पाळू शकाल अशाच सवयी निवडा. कारण, सातत्याने पाळल्या गेलेल्या सवयीच तुम्हाला खऱ्या अर्थाने निरोगी ठेवतात.


